मुंबई । वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) माजी प्रवक्ते राम माधव यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या (ISI) काही निवृत्त अधिकाऱ्यांची श्रीलंकेत भेट घेतल्याचा दावा आंबेडकर यांनी केला आहे. या भेटीत चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या भेटीबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. राम माधव आणि आयएसआयच्या निवृत्त अधिकाऱ्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याचा खुलासा आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘त्या चार मुद्द्यांचा खुलासा करा’
आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मागील काही महिन्यांत राम माधव यांनी श्रीलंकेत आयएसआयच्या काही निवृत्त अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीत चार मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आपल्याकडे असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, हे चार मुद्दे नेमके कोणते होते, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी आरएसएस आणि केंद्र सरकारलाही प्रश्न विचारले आहेत. राम माधव किंवा आरएसएसला आयएसआयचे पदाधिकारी अथवा परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा अधिकृत अधिकार सरकारने दिला होता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
विरोधकांवरही निशाणा
प्रकाश आंबेडकर यांनी या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनाही लक्ष्य केले आहे. देशातील विरोधी पक्षनेते भारतीय सुरक्षा आणि राम माधव यांच्या कथित भेटीबाबत प्रश्न उपस्थित करताना दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अशा विषयांवर सरकारला जाब विचारण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.वंचित बहुजन आघाडीला आता राष्ट्रीय प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. नागरिकांनीही या विषयावर सार्वजनिक ठिकाणी चर्चा करावी आणि सरकारकडे याबाबत स्पष्टीकरण मागावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, राम माधव यांनी आयएसआयच्या निवृत्त अधिकाऱ्यांची श्रीलंकेत भेट घेतल्याचा आणि त्या बैठकीत चार मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा दावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या दाव्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप समोर आलेली नाही.















Discussion about this post