जळगाव । राज्यात सध्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असली तरी वातावरणात पुन्हा विजांसह पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जळगाव जिल्ह्यातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
सध्या ईशान्य मध्य प्रदेश परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राला लागून समुद्रसपाटीपासून सुमारे ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबमधील अमृतसर, मुझफ्फराबाद, कानपूर, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, दाल्तोंगंज आणि दिघामार्गे ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागांत तुरळक हलक्या सरी पडू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानातील बदलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यातील इतर भागांतही पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. मात्र, काही ठिकाणी अद्याप हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू आहेत. आज सोलापूरसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उर्वरित महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. त्यामुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असला तरी काही ठिकाणी अचानक हलक्या ते मध्यम सरींची शक्यता कायम आहे.















Discussion about this post