नाशिक । नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “नाशिक इतकं सुंदर केलं होतं, तर मग तुमचा एकही नगरसेवक पुन्हा का निवडून आला नाही?” असा सवाल करत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला.
माध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले की, नाशिककरांनी मनसेची सत्ता आणि त्यांचा कार्यकाळ पाहिला आहे. जर शहराचा इतका विकास झाला असता, तर जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला असता. मात्र, एकही नगरसेवक निवडून न आल्याने जनतेनेच त्यांच्या कामाला नकार दिला, असा टोला त्यांनी लगावला.
‘गुजरातच्या कंत्राटदारांचा आरोप चुकीचा’
नाशिकमधील विकासकामे गुजरातच्या कंत्राटदारांना दिल्याचा राज ठाकरे यांनी केलेला आरोपही महाजन यांनी फेटाळून लावला. शहरात सुरू असलेल्या सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची यादी देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. “कोणता ठेकेदार गुजरातचा आहे, हे राज ठाकरे यांनी दाखवून द्यावे. ऑनलाइन टेंडर प्रक्रियेत कोणालाही सहभागी होता येते. तरीही बाहेरील राज्यातील ठेकेदार कोण आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे,” असे खुले आव्हान महाजन यांनी दिले.
नाशिकमधील प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात येत असून, पुढील 30 ते 40 वर्षे खड्डे पडणार नाहीत, असा दावा गिरीश महाजन यांनी केला. शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरिकांना काही काळ गैरसोय होत असल्याची कबुली देत, त्याबद्दल यापूर्वी दिलगिरीही व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक महापालिकेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपांवरही महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. “महापालिकेची अनेक कामे 20 ते 22 टक्के कमी दरात (बिलो) देण्यात आली आहेत, तर फायबर केबलची कामे 42 टक्के कमी दरात मंजूर झाली आहेत. अशा परिस्थितीत भ्रष्टाचार कसा झाला, हे राज ठाकरे यांनी स्पष्ट करावे,” असे ते म्हणाले.तसेच, सर्व विकासकामांवर तांत्रिक देखरेख ठेवण्यासाठी आयआयटीच्या तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगत, कोणत्याही निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झालेला नसल्याचा दावा त्यांनी केला.दरम्यान, नाशिकमधील रस्ते, खड्डे आणि विकासकामांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.















Discussion about this post