जळगाव\ मुंबई । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिक आणि गणेशभक्तांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


या काळात काही ठिकाणी मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई-पुण्यासह अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेला उकाडा आणि उन्हाचा चटका यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पालघर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, ठाणे, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगावमध्ये दीड महिन्यानंतर पावसाची दमदार हजेरी
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या महिना-दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने रात्री जोरदार हजेरी लावली. काही भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस झाल्याने वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला. मात्र, लांबलेल्या पावसामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
पिकांसाठी पावसाची नितांत गरज असताना झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेची किरणे उमटली आहेत. आगामी दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास खरीप पिकांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या तयारीत असतानाच पावसाने पुन्हा जोर धरल्याने नागरिकांनी उत्साहासोबतच हवामानाचीही खबरदारी घेण्याची गरज आहे.















Discussion about this post