धुळे । धुळ्यातून एक धकाकदायक घटना समोर आलीय. दारूच्या नशेत संतापलेल्या पित्याने आपल्या दोन चिमुकल्या मुलींवर काचेच्या बाटलीने हल्ला केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्यावरील पुलाखाली घडली. या हल्ल्यात दोन आणि चार वर्षांच्या दोन्ही मुली जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पित्याविरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनेश आत्माराम सोलंकी (२१, रा. काबरी, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्य प्रदेश) असे संशयित आरोपीचे नाव आहे. नित्या दिनेश सोलंकी (२) आणि दिव्या दिनेश सोलंकी (४) अशी जखमी झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.


पुलाखालीच मुलींवर हल्ला
पोलिसांच्या माहितीनुसार, दिनेश सोलंकी हा कुटुंबासह बाभळे फाट्यावरील पुलाखाली आला होता. यावेळी तो दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले. कोणत्या तरी कारणावरून संतापलेल्या दिनेशने आपल्या दोन्ही मुलींवर काचेच्या बाटलीने वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन्ही मुलींच्या डोक्याला दुखापत झाली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी मुलींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आईने दिली पोलिसांत तक्रार
घटनेनंतर मुलींची आई राधिका दिनेश सोलंकी यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिनेश सोलंकी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील खुनाच्या प्रयत्नाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे. घटनेमागील नेमके कारण, हल्ल्याचा घटनाक्रम आणि संबंधित व्यक्तींचे जबाब याबाबत माहिती घेतली जात आहे. जखमी मुलींच्या वैद्यकीय अहवालाचाही तपासात विचार केला जाणार आहे.
दरम्यान, दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन कौटुंबिक वातावरणात निर्माण होणाऱ्या तणावाचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याच्या घटना चिंताजनक ठरत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सोनगीर पोलीस करीत आहेत.














Discussion about this post