मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय झाला असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील २० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून जळगावसह मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथा परिसरासाठी यलो अलर्ट जारी केला असून या भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा दिला आहे. तसेच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित राज्यातही ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
दरम्यान, मुंबईत रविवारी रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली असून सोमवारी सकाळीही मुसळधार सरी सुरूच होत्या. सततच्या पावसाचा परिणाम मुंबईच्या उपनगरी रेल्वे सेवांवर झाला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे, तर हार्बर मार्गावरील लोकल सुमारे १० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
दरम्यान, पेरणीनंतर पावसाच्या खंडामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, हवामान विभागाने मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.















Discussion about this post