जळगाव/मुंबई । मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या मुसळधार पावसाने अखेर काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. काल रात्रीपासून अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची तीव्रता ओसरल्याने विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याचाही यामध्ये समावेश असून, काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागात तसेच सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरात आज अति जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिकच्या घाटमाथा भागात तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी तसेच प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि पूर्व विदर्भातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात पावसाची परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच आज सकाळी मराठवाडा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. त्यामुळे एका बाजूला पावसाची परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला भूकंपामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.















Discussion about this post