रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिपची संधी शोधणाऱ्या दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आहे. दक्षिण रेल्वेच्या रेल्वे भरती कक्षाने (RRC) विविध ट्रेडमधील तब्बल ४,४७१ अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये फ्रेशर तसेच एक्स-आयटीआय उमेदवारांसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकूण ४,४७१ पदांपैकी १७७ पदे फ्रेशर उमेदवारांसाठी, तर ४,३०८ पदे एक्स-आयटीआय उमेदवारांसाठी आहेत.
विविध ट्रेडमध्ये भरती
फ्रेशर उमेदवारांसाठी फिटर, पेंटर, वेल्डर यांसह विविध ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिपची संधी आहे. मेडिकल लॅब टेक्निशियन ट्रेडसाठी मात्र भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एक्स-आयटीआय प्रवर्गामध्ये फिटर, मशिनिस्ट, मोटार व्हेईकल मेकॅनिक, टर्नर, डिझेल मेकॅनिक, कारपेंटर, पेंटर, वेल्डर, वायरमन, प्लंबर, ड्राफ्ट्समन, आर अँड एसी मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक तसेच COPA-PASSA यांसारख्या ट्रेडचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता काय?
फ्रेशर उमेदवारांनी संबंधित ट्रेडनुसार दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावीवर आधारित ट्रेडसाठी १०+२ प्रणालीअंतर्गत किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत.
एक्स-आयटीआय उमेदवारांसाठी दहावीमध्ये किमान ५० टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमधील मान्यताप्राप्त आयटीआय प्रशिक्षण आणि NCVT/SCVT प्रमाणपत्र आवश्यक आहे. इलेक्ट्रीशियन ट्रेडसाठी दहावीत विज्ञान विषय आवश्यक असून, इलेक्ट्रीशियन मेकॅनिकसाठी विज्ञानासोबत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताची आवश्यकता आहे. COPA-PASSA ट्रेडसाठी संबंधित राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र आवश्यक आहे.
SC, ST आणि PwBD उमेदवारांना दहावीतील ५० टक्के गुणांची अट लागू नाही.
वयोमर्यादा किती?
उमेदवारांचे वय २८ ऑगस्ट २०२६ रोजी विचारात घेतले जाणार आहे. उमेदवाराचे किमान वय १५ वर्षे असावे. फ्रेशर उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा २२ वर्षे असून, काही एक्स-आयटीआय आणि MLT प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय २४ वर्षांपर्यंत आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत मिळणार आहे.
परीक्षा नाही, थेट गुणवत्तेवर निवड
या भरतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांची निवड करण्यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. निवड प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारे पार पडणार आहे.
फ्रेशर उमेदवारांची गुणवत्ता दहावीच्या गुणांवर निश्चित केली जाईल. तर एक्स-आयटीआय उमेदवारांसाठी दहावी आणि आयटीआयमधील गुणांना समान महत्त्व देऊन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. मात्र, अप्रेंटिस म्हणून निवड होणे म्हणजे दक्षिण रेल्वेमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणे नाही. ही भरती अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे.

दरमहा मिळणार ९,६०० रुपयांपर्यंत विद्यावेतन
अप्रेंटिसशिप प्रशिक्षणादरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना मासिक विद्यावेतन दिले जाणार आहे. दहावी उत्तीर्ण फ्रेशर उमेदवारांना दरमहा ८,२०० रुपये, तर बारावी उत्तीर्ण आणि एक्स-आयटीआय उमेदवारांना ९,६०० रुपये मासिक विद्यावेतन मिळणार आहे. पुढील वर्षी विद्यावेतनात वाढ करण्याचीही तरतूद आहे.
अर्ज शुल्क किती?
सर्वसाधारण, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, PwBD आणि सर्व महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करावा. दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेच्या अप्रेंटिसशिपमध्ये प्रवेश मिळवण्याची ही महत्त्वाची संधी मानली जात आहे.














Discussion about this post