मुंबई । मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे सध्या राजकीय वातावरण तापलेले असताना अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या जेवणाच्या निमंत्रणाची चर्चा रंगली आहे. “मनोज जरांगे माझे भाऊ आहेत,” असे म्हणत त्यांनी जरांगे यांना घरी जेवणासाठी येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, सध्या आंदोलनाच्या मैदानात असल्याने जेवणासाठी येणे शक्य नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर आपली भूमिका मांडली. त्यांच्या निमंत्रणामागील भावना आपण समजून घेत असल्याचे सांगतानाच, आंदोलन सुरू असताना त्यांच्याकडे जेवायला जाणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे म्हणाले की, अमृता फडणवीस यांनी आपल्याला भाऊ म्हटले आहे, त्यामुळे भाऊबीजेच्या वेळी त्यांच्या घरी जाण्यात कोणतीही अडचण नाही. “भाऊबीजेला ताईने बोलावलं तर नक्की जाईन. साडी-चोळी घेऊन जाईन. पण आता आंदोलन सुरू आहे,” अशी भूमिका त्यांनी घेतली.
आपण सध्या एका मोठ्या लढ्यात असल्याचे सांगत जरांगे यांनी भावनिक मुद्दाही मांडला. गरीबांच्या लेकरांसाठी आणि मराठा समाजाच्या प्रश्नासाठी आपण मैदानात उतरल्याचे सांगत त्यांनी या काळात आंदोलनातून बाजूला होणे योग्य नसल्याचे म्हटले.“भाऊ मैदानात असताना बहिणीने बोलावू नये. भाऊ संकटात जातो. बहिणीने तेवढा तरी बारकाईने विचार करावा,” असे जरांगे म्हणाले.त्यामुळे अमृता फडणवीस यांनी दिलेले निमंत्रण सध्या स्वीकारण्याऐवजी आंदोलन संपल्यानंतर किंवा भाऊबीजेच्या वेळी भेटण्याचा त्यांचा सूर आहे.
‘ताईच्या भावनेचा आदर आहे’
अमृता फडणवीस यांनी कोणत्याही चुकीच्या हेतूने निमंत्रण दिलेले नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यांनी चांगल्या भावनेने आणि मायेने केलेल्या आवाहनाचा आपण त्याच भावनेने स्वीकार करत असल्याचे ते म्हणाले.“एखादा माणूस चांगल्या भावनेने एखादा विषय मांडत असेल तर प्रत्येक वेळी त्याच्या आडवं जाण्याची गरज नसते. ताईंनी ज्या मायेने आणि दयेने आवाहन केले, त्याच मायेने आपण उत्तर दिले आहे,” असे जरांगे यांनी सांगितले.














Discussion about this post