जळगाव । जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आणि शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टॉवर चौक परिसरातील एका नामांकित लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. अत्यंत गोपनीयरीत्या टाकलेल्या या छाप्यात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
टॉवर चौकातील एका लॉजमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बेकायदेशीररीत्या वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची खात्रीशीर माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार, एलसीबी आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) संयुक्तपणे सापळा रचला. पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला लॉजवर पाठवले. व्यवहार निश्चित होताच इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या पथकाने लॉजवर धाड टाकली आणि हा प्रकार उघडकीस आणला.
या कारवाईत वेश्याव्यवसाय चालवणारा मुख्य आरोपी राजू मोतीराम जोशी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध ‘पीटा’ (PITA) कायद्याच्या कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटचे जाळे जिल्ह्यात अन्य कुठे पसरले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
रॅकेटमध्ये अडकलेल्या महिलांची पोलिसांनी सुटका केली असून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. त्यांना सुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.














Discussion about this post