पुणे । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमावरून पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राहुल गांधी या कार्यक्रमातून सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून, त्यांच्या कार्यक्रमासाठी शहरातील विविध भागांत बॅनर्स झळकले आहेत. मात्र, भाजपकडून या कार्यक्रमाला विरोध करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यातील काही घडामोडींवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ५० ते ६० काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कार्यक्रमासाठी काँग्रेसचे अनेक नेते पुण्यात दाखल झाले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. राहुल गांधींचा कार्यक्रम होऊ नये आणि कार्यकर्त्यांमध्ये भीती निर्माण व्हावी, यासाठी जाणीवपूर्वक वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘भाजपची गुंडगिरी’ असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप
वडेट्टीवार म्हणाले की, काल घडलेली घटना ही भाजपच्या गुंडगिरीचा प्रकार होता. राहुल गांधींना घाबरवण्यासाठी तसेच त्यांचा कार्यक्रम होऊ नये, यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. युवक काँग्रेसला घाबरवण्याचा आणि कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
महाविद्यालयातील विद्यार्थिनींना भीतीपोटी डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी महाविद्यालयाबाहेर छेडछाडीची घटना घडल्याचे सांगितले. ही माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
ABVP कार्यकर्त्यांवर गुन्ह्याची मागणी
या घटनेप्रकरणी ABVPच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेसने पोलिसांकडे केल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. पोलिसांकडून मुला-मुलींना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला असून, या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे त्यांनी म्हटले.
महाविद्यालयाच्या गेटवर भाजपचे काही कार्यकर्ते आल्याने परिस्थिती चिघळली आणि उद्रेक होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला. दरम्यान, राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होणार असल्याने पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसने केलेल्या आरोपांवर भाजपची भूमिका काय राहते, याकडे आता लक्ष लागले आहे.















Discussion about this post