जळगाव । जळगाव शहरातील वाघनगर परिसरात एका घरात सुरु असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या कारवाईत तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही कारवाई थेट उपविभागीय अधिकाऱ्यांनी केल्यामुळे, स्थानिक पोलिसांकडून घेण्यात येणाऱ्या भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
वाघनगर परिसरात अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती SDPO यांच्या पथकाला मिळाल्यानंतर अचानक छापा टाकण्यात आला. तिथे तीन महिला आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्या. पोलिसांनी तात्काळ या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे वाघ नगर परिसरात एकच खळबळ उडाली आणि अवैध कृत्यांविरुद्ध पोलिसांच्या धडक कारवाईची चर्चा सुरू झाली.
या कारवाईमध्ये अॅन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट (AHTU) च्या महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. त्यामुळे, ताब्यात घेण्यात आलेल्या महिला या पीडित आहेत का, त्यांना या व्यवसायात बळजबरीने आणले गेले होते का, या मानवी तस्करीच्या अँगलनेही पोलीस सखोल तपास करत आहेत.
पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत पोकॉ सचिन साळुंखे, अवेश शेख, अशोक फुसे तसेच AHTU युनिटच्या योगिता नारखेडे आणि मनिषा पाटील यांनी सहभाग घेतला. या अवैध व्यवसायाचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि हे रॅकेट किती मोठ्या प्रमाणात पसरले आहे, याचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.















Discussion about this post