जामनेर । बकरी ईदच्या अवघ्या एका दिवसांवर आलेली असताना जामनेर शहरात पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाने अवैध पशुतस्करी आणि गोवंशाची कत्तल करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर बडगा उगारला आहे. या कारवाईत तब्बल ६० ते ६५ जनावरांची क्रूरतेच्या विळख्यातून सुटका केली. या धडक कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील अवैध पशुतस्करांचे धाबे दणाणले आहेत.
जामनेर शहरातील घोडे पीर बाबा घरकुल परिसर, मदनी नगर आणि इस्लामपूर भागात मोठ्या प्रमाणावर जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, मुख्याधिकारी नितीन बागुल आणि पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने संशयित ठिकाणांवर अचानक छापेमारी केली.
कारवाईदरम्यान संशयास्पद गोदामांमध्ये आणि आवारात कत्तल तसेच अवैध वाहतुकीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयपणे बांधून ठेवलेली ६५ पेक्षा जास्त जनावरे पोलिसांना आढळून आली. प्रशासनाने तात्काळ कारवाई करत या सर्व जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षिततेसाठी जळगाव येथील गोशाळेत हलविले.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्रशासनाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध पशुतस्करीविरोधात कठोर संदेश गेला असून आगामी काळात अशा प्रकारांवर आणखी कडक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.














Discussion about this post