जळगाव : दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदेच्या मंगलमय पर्वानिमित्त आकाशवाणी जळगाव आणि स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी ‘पाडवा पहाट’ या प्रातःकालीन संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी उद्यानात सकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
आकाशवाणी जळगावच्या ५० व्या वर्षपूर्तीनिमित्त आणि चांदोरकर प्रतिष्ठानच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित या मैफिलीला कै. नथ्थूशेट चांदसरकर ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे. मैफिलीत अभंगवाणी, नाट्यगीते आणि सुगम संगीताचा सुरेल नजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे.
या कार्यक्रमात नाशिक येथील तसेच आकाशवाणी जळगावचे मान्यताप्राप्त कलाकार आशिष रानडे, ईश्वरी दसक्कर कदडी आणि पूजा दसक्कर सादरीकरण करणार आहेत. त्यांना तबल्यावर सुजित काळे, संवादिनीवर सुभाष दसक्कर, सिंथेसायझरवर विजय नेवे आणि ऑक्टोपॅडवर नितेश पाटील साथसंगत करणार आहेत. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन दीपिका घैसास करणार आहेत.
या सोहळ्याला खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, आकाशवाणी जळगावचे कार्यक्रम प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे, उद्योगपती अशोकभाऊ जैन आणि कै. नथ्थूशेट चांदसरकर ट्रस्टचे मेजर नानासाहेब वाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे, ही मैफल आकाशवाणी जळगाववरून प्रसारित होणार असल्याने कार्यक्रम सकाळी ठीक ६ वाजता सुरू होणार आहे. रसिकांनी कार्यक्रम सुरू होण्याच्या किमान दहा मिनिटे आधी उपस्थित राहून या संगीत मैफिलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आकाशवाणी जळगाव, स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि चांदसरकर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.















Discussion about this post