जळगाव । जळगाव शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोरीच्या घटना वाढताना दिसत असून अशातच शहरातील प्रकाश मेडिकल चौक ते महात्मा फुले मार्केट दरम्यान एका नागरिकाच्या खिशातील १०,००० रुपये लांबविणाऱ्या तीन सराईत चोरांना जळगाव शहर पोलिसांनी अत्यंत अल्प वेळात जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीची संपूर्ण रोकड हस्तगत केली आहे.
काय आहे नेमकी घटना?
फिर्यादी जावेद खान रसुल खान (वय ४०, व्यवसाय गवंडीकाम, रा. हमीदनगर, चोपडा, ह.मु. मासुमवाडी, जळगाव) हे दिनांक ३० जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० ते ३.०५ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील प्रकाश मेडिकल चौक ते महात्मा फुले मार्केट परिसरातील टीपटॉप वेअर दुकानासमोर उभे होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या पँटच्या खिशाला हात मारून त्यातील १०,०००/- रुपये रोख रक्कम लांबवली. याप्रकरणी फिर्यादीच्या खबरीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकश्रीकांत धिवरे यांच्या विशेष आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी एक विशेष शोध पथक नेमले.
या पथकाने घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून पडताळणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषणासाठी ‘नेत्रम’ आणि ‘CDR लोकेशन’ विभागाची मदत घेतली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी अरशद शेख रज्जाक उर्फ चिकु शाहरुख (वय ३२ वर्ष), फारुख शेख हनीफ (वय २८ वर्ष) व शाकीर शेख शकील उर्फ घा-या राजु (वय ३० वर्ष) या तिघांना बेड्या ठोकल्या
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण १०,०००/- रुपयांची रोकड जप्त केली आहे.















Discussion about this post