मुंबई : डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्येच मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डिलिमिटेशन विधेयकाच्या समर्थनाची भूमिका घेण्याचे संकेत दिल्यानंतर काँग्रेसने थेट राष्ट्रवादीच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने ‘एक्स’वर पोस्ट करत शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जुन्या राजकीय मदतीची आठवण करून दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी विधेयक वाचल्यानंतरच पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे सांगितले आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर सरकारला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका सध्या संभ्रम निर्माण करणारी ठरत आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे. ‘शरद पवार साहेबांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता’, अशी आठवण काँग्रेसने करून दिली.
काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा संदर्भ दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे त्यावेळी १० आमदार होते, तर एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे १६ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला होता. त्यावेळी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढेवेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवून शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीने एकमताने शरद पवार यांची उमेदवारी निश्चित केल्याचा दावा काँग्रेसने केला.
‘परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत,’ अशा शब्दांत काँग्रेसने राष्ट्रवादीच्या संभाव्य भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच काँग्रेसने एक भावनिक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘गद्दारांची मांदियाळी असताना राहुल गांधींनी शरद पवार साहेबांना भक्कम आधार दिला होता,’ असा उल्लेख करत काँग्रेसने राष्ट्रवादीला जुन्या राजकीय मदतीची आठवण करून दिली आहे. त्यामुळे डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून आता इंडिया आघाडीतील मतभेद अधिक उघड होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अंतिम भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post