मुंबई । मतचोरीचा मुद्दा थंडावलेला असतानाच महाराष्ट्रात या मुद्द्यावरून विरोधकांनी रान माजवलं आहे. आज उद्धव ठाकरे (शिवसेना, ठाकरे गट), मनसेप्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांच्या नेत्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाचं विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले. त्यातही सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परप्रांतिय मतदारांचा मुद्दाही या निवदेनात घेण्यात आला असून निवडणूक आयोगाला त्यावर पर्यायही सूचवला आहे.
विरोधी पक्षांच्या या शिष्टमंडळात खासदार संजय राऊत, अनिल परब, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील (शेतकरी कामगार पक्ष) आणि सीपीआयएमच्या (CPIM) नेत्यांचा देखील समावेश होता. महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांच्या म्हणण्यानुसार, या बैठकीचा मुख्य उद्देश लोकशाही प्रक्रिया मजबूत करणे आणि निवडणूक प्रक्रियेबद्दल जनतेच्या मनात असलेला विश्वास अधिक दृढ करणे हा होता. विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या निवेदनात आयोगाच्या कार्यपद्धतीवरच गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या कामकाजाबद्दल सामान्य जनतेच्या मनात खूप शंका आहेत आणि निवडणूक आयोग खरोखरच स्वायत्त आहे की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी किती मतदार वगळले गेले, याचा तपशील का मिळत नाही? एखाद्या व्यक्तीचे नाव मतदार यादीतून का काढले गेले, हे त्याला का सांगितले जात नाही? निवडणूक आयोगाने वगळलेल्या नावांचा आणि इतर तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावा असे आवाहन देखील या निवेदनातू करण्यात आले आहे.
विधानसभेसाठी वापरण्यात आलेली ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 दरम्यान नावे वाढवलेली यादी अजूनही का प्रसिद्ध करण्यात आली नाही? मतदार यादी लपवण्यामागे काही राजकीय छुपे हेतू आहेत की, कोणाचा दबाव आहे, असा थेट प्रश्न शिष्टमंडळाने विचारला आहे. तसेच परप्रांतिय मतदारांचा मुद्दाही या निवदेनात घेण्यात आला
राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातून कामासाठी येणाऱ्यांचा भरणा आहे. यातील अनेक मतदार त्यांच्या मूळच्या राज्यातदेखील मतदार असतात आणि इथे पुन्हा महाराष्ट्रात पण मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करून घेतात. मुळात दोन दोन ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी करणे, मतदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे, असं म्हटलं आहे. या निवेदनात नव्याने 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या तरुणांच्या मतदानाचा मुद्दाही उचलण्यात आला आहे. आज जी मुलं 18 वर्षाची होणार आहेत. त्यांना मतदानाचा हक्क नसणार आहे. मग या मुलांनी पाच वर्ष थांबायचं का? त्यांची मतदान नोंदणी का होत नाही? असा सवालही या निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, मविआच्या सर्वपक्षीय शिष्टमंडाळाने सादर केलेल्या या निवेदनावर राज ठाकरे यांची छाप दिसून आली. या निवेदनाची सुरुवात ‘सस्नेह जय महाराष्ट्र’, अशी करण्यात आली आहे. राज ठाकरे हे पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकत्र आले आहेत. राज ठाकरे हे मविआच्या नेत्यांसोबत एकत्र येणे महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे.















Discussion about this post