जळगाव | प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका एमएच-१९/ईझेड-०००१ ते ९९९९ ही ५ नोव्हेंबर २०२६ पासून नियमित सुरू करण्यात येणार आहे.
या मालिकेतील आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करू इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज सादर करावेत. अर्जासोबत पसंतीच्या क्रमांकानुसार विहित शासकीय शुल्काचा राष्ट्रीयीकृत बँकेचा धनाकर्ष (डीडी), उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे सादर करणे आवश्यक आहे. तसेच वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाची आहे, त्यांचे संपूर्ण नाव, पत्त्याचा पुरावा आणि आधारकार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे.
एकाच पसंतीच्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारांना वाढीव शुल्काचा धनाकर्ष स्वतंत्र बंद लिफाफ्यातून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत सादर करावा लागेल. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात अर्जदारांच्या उपस्थितीत बंद लिफाफे उघडण्यात येतील. सर्वाधिक रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास संबंधित पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. उर्वरित अर्जदारांचे धनाकर्ष परत करण्यात येतील.
आकर्षक क्रमांकाची पावती प्राप्त झाल्यानंतर ती वाहन नोंदणीसाठी वितरकाकडे देणे बंधनकारक असून, या पावतीची वैधता केवळ १८० दिवस राहणार आहे. तरी इच्छुक वाहनधारकांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून पसंतीचे नोंदणी क्रमांक आरक्षित करावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश ताटू, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी केले आहे.















Discussion about this post