मुंबई : सरकारी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ लिमिटेड अर्थात ओएनजीसीने (ONGC) देशभरात एकूण ३ हजार ४७ अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (NAPS) च्या apprenticeshipindia.gov.in आणि नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) च्या nats.education.gov.in या पोर्टलवरून अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदासाठीची शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१० वी ते पदवीधर उमेदवारांना संधी
या भरतीमध्ये पदानुसार दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, बी.एस्सी., बी.ई., बी.टेक. आणि बी.बी.ए. उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. उमेदवारांचा जन्म २९ नोव्हेंबर २००२ ते २९ नोव्हेंबर २००८ या कालावधीत झालेला असावा. म्हणजेच उमेदवारांचे वय किमान १८ आणि कमाल २४ वर्षे असणे आवश्यक आहे. पदनिहाय पात्रतेसाठी अधिकृत अधिसूचना तपासणे गरजेचे आहे.
शैक्षणिक गुणवत्तेवर निवड
उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रतेतील गुणांच्या आधारे तयार करण्यात येणाऱ्या गुणवत्ता यादीद्वारे केली जाणार आहे. ही गुणवत्ता यादी १५ डिसेंबर २०२६ रोजी जाहीर होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर माहिती दिली जाईल. त्यानंतर संबंधित उमेदवारांना कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे.
दरमहा ८,२०० ते १२,३०० रुपये विद्यावेतन
निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा विद्यावेतन दिले जाणार आहे. यामध्ये पदवीधर अप्रेंटिससाठी १२ हजार ३०० रुपये, तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेल्यांसाठी १० हजार ९०० रुपये, दोन वर्षांचा आयटीआय पूर्ण केलेल्यांसाठी १० हजार ५६० रुपये, एक वर्षाच्या ट्रेड अप्रेंटिससाठी ९ हजार ६०० रुपये, तर दहावी आणि बारावी उत्तीर्ण ट्रेड अप्रेंटिससाठी ८ हजार २०० रुपये विद्यावेतन निश्चित करण्यात आले आहे.
त्यामुळे ओएनजीसीमध्ये अप्रेंटिस म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या पात्र तरुणांनी २० नोव्हेंबरपूर्वी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. भरतीसंदर्भातील पदनिहाय माहिती, पात्रता आणि अर्जाच्या अटी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी ओएनजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरील अधिसूचना तपासावी.















Discussion about this post