जळगाव । मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात भारताला यश आले असले, तरी पाकिस्तानात आश्रयाला असलेल्या अन्य फरार आरोपींविरोधात आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई तीव्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
ज्येष्ठ विधिज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनांशी संबंधित आरोपींसह मुंबई हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांना सूचना देणाऱ्या हँडलर्सविरोधात नव्या कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या फरार आरोपींविरोधात इंटरपोलच्या माध्यमातून जामीनपात्र वॉरंट जारी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही निकम यांनी दिली. या कारवाईमुळे पाकिस्तानात असलेल्या आरोपींवरील कायदेशीर दबाव वाढण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेचे परिणाम लवकरच पाहायला मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, २६/११ च्या हल्ल्यात १६६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या जखमा आजही देशाच्या स्मरणात ताज्या असून, फरार आरोपींना न्यायाच्या कक्षेत आणण्याचे भारताचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत.














Discussion about this post