कोलकाता: रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तृणमूल काँग्रेसच्या (TMC) राष्ट्रीय अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “भाजपच्या हुकूमशाहीविरोधात आता नैतिक आणि राजकीय लढाई सुरू झाली असून, सर्व विरोधी पक्ष, एनजीओ आणि सामाजिक संघटनांनी एकत्र यावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
ममता बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप करताना सांगितले की, “आम्ही कालीघाट चौक, मुक्तदल आणि अग्निशमन दलाच्या स्टेशनसमोर रवींद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, प्रशासनाने तिन्ही जागांवर परवानगी नाकारली. टीएमसीला गप्प करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असून, आता कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयातच जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.”
राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बंगालमध्ये सध्या दहशतीचे आणि हुकूमशाहीचे वातावरण आहे. “भाजपचे गुंड कार्यकर्त्यांच्या घराबाहेर धमकावत आहेत आणि पोलीस गप्प आहेत. दलित समाजातील एका ९२ वर्षीय वृद्ध महिलेला घर सोडून आश्रय घ्यावा लागला, तर एका नवविवाहित वधूलाही घर रिकामे करण्याची धमकी देण्यात आली,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
मी स्वतः वकील आहे, उघडपणे लढणार
ममता बॅनर्जी यांनी आपल्या लढाऊ बाण्याचा पुनरुच्चार करताना म्हटले की, “जे निर्भीड आहेत आणि ज्यांचे मातृभूमीवर प्रेम आहे, त्यांनी या लढ्यात सामील व्हावे. मी स्वतः वकील आहे आणि मी भाजपच्या या अन्यायाविरोधात उघडपणे रस्त्यावर उतरून लढणार आहे.” असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.
आपल्या कार्यकाळातील सहिष्णुतेचा दाखला देताना त्या म्हणाल्या, “मी २०११ पासून सत्तेत आहे, पण कधीही कोणाला त्रास दिला नाही किंवा हिंसाचार केला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या सुरक्षेसाठी मी स्वतःची बुलेटप्रूफ कार पाठवली होती आणि त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा दिली होती. मात्र, भाजपने सत्तेत येताच त्यांची सुरक्षा आणि इतर सोयीसुविधा तातडीने हटवल्या.”















Discussion about this post