मुंबई । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. दिल्लीत झालेल्या हायव्होल्टेज बैठकीत हा तिढा सुटला असून, त्यानुसार भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्वाधिक ११ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) वाट्याला ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजीत पवार) पदरात २ जागा पडल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जळगावची महत्त्वाची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. येत्या २४ तासांत यावर अधिकृत शिक्कामोर्तब होऊन पुढील २ ते ३ दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर केली जाण्याची दाट शक्यता आहे.
महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे काही वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाणे, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या जागा शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि कोकण मतदारसंघ मिळण्याची चर्चा आहे. रायगडमधून राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांच्या मुलाच्या नावाची चर्चा सुरू असून पुण्यातही अनेक इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.
दुसरीकडे भाजपने जळगाव, सोलापूर, नांदेड, नागपूर, अमरावतीसह अनेक महत्त्वाच्या जागांवर दावा मजबूत केला आहे. जळगाव मतदारसंघ भाजपच्या खात्यात गेल्यास स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १ जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. २ जून रोजी अर्जांची छाननी होणार असून ४ जूनपर्यंत उमेदवारी माघारी घेता येणार आहे. निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जूनला मतमोजणी केली जाणार आहे.
महायुतीच्या अधिकृत जागावाटपाची घोषणा पुढील २४ तासांत होण्याची शक्यता असून त्यानंतर उमेदवारांची नावेही जाहीर होणार आहेत. त्यामुळे राज्यासह जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.














Discussion about this post