मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईसह राज्यातील काही भागांत शुक्रवारी पावसाने हजेरी लावली असून, आज मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ४ ते ५ दिवस राज्यात ढगाळ वातावरण कायम राहणार असून अनेक ठिकाणी रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा, तर काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
आज यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामातील पिकांसाठी चांगल्या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.
कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज
कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच घाट परिसरातील अनेक भागांत जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे.
पुढील ५ दिवस कसे राहणार हवामान?
हवामान तज्ज्ञांच्या मते, राज्यातील वातावरण पावसासाठी अनुकूल बनत असून पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळणार असला तरी नागरिकांनी वादळी पावसाच्या वेळी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post