अकोला: पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा अंधश्रद्धेच्या विळख्याने ग्रासल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यातील निंबा गावातून एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये भोंदूबाबा चिमुकल्या जीवांच्या जिवाशी खेळताना दिसत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार भोंदूबाबांना नोटीस बजावली आहे.
बाळ रडत होतं, बाबा अघोरी खेळ खेळत होता
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक भोंदूबाबा लहान मुलांना आपल्या दाताने उचलून थिरकताना दिसत आहे. बाळ जिवाच्या आकांताने रडत असतानाही आजूबाजूला ढोलकी आणि संबळाच्या तालावर हा अघोरी प्रकार सुरूच होता. आपल्या मुलांच्या समस्या सुटाव्यात या आशेने अंधश्रद्धेपोटी पालकच आपल्या पोटच्या गोळ्यांना या भोंदूबांच्या हवाली करत असल्याचे पाहून परिसरातून संताप व्यक्त होत आहे.
राजेंद्र डहाके हे चार बाबा आपला दरबार भरवतात. त्यातील चेतन मुळे उर्फ गुलालशेष महाराजांच्या दरबारात लहान मुलांना दाताने उचलले, खिळ्यांच्या आसनावर बसणे यासोबतच अनेक अघोरी प्रकार केले जातात. दहावी नापास असलेला हा महाराज गेल्या दहा वर्षांपासून दरबार भरतो. दरबारात लिंबू फेकणे, कोडं सोडवणे, अनेक व्याधी, रोग आणि कौटुंबिक समस्यांवर उपचाराचा दावा ही महाराजांकडून केला जातो.
दुसरीकडे या अंधश्रद्धेविरोधात अंनिसनं आक्रमक पवित्रा घेतला. तर हा व्हीडीओ समोर आल्यानंतर जाग आलेल्या पोलिसांनी चेतन महाराज आणि मधु महाराज यांच्यासह आणखी दोन भोंदूबाबांना अंधश्रद्धा पसरवण्यासंदर्भात केवळ नोटीस बजावलीय.
खर तर कायद्याने कोणत्याही वैद्यकीय आजारावर अघोरी पद्धतीने उपचाराचा दावा करणे हा गुन्हा आहे. तरीही, राज्यात खुलेआम हा प्रकार सुरू असतो. भक्ती आणि अंधश्रद्धा यातील पुसट रेषा जेव्हा ओलांडली जाते, तेव्हा अशा अघोरी प्रथा जन्माला येतात. राज्यात खरातसारखी प्रकरणही घडत असतात..त्यामुळेच या भोंदूना कायद्याचा बडगा तर दाखवला पाहिजेच पण अशा भोंदू बाबा-बुवांच्या पायावर लोटांगण घालणाऱ्यांनीही थोड तरी भान राखणं गरजेच आहे.















Discussion about this post