नाशिक । राज्यात आगामी विधानपरिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले असून नाशिक विधानपरिषदेच्या जागेवरून एकीकडे महायुतीत भाजप आणि शिवसेनेत जागावाटपाची रस्सीखेच सुरू असतानाच, आता भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी आणि चुरस प्रचंड वाढल्याचे चित्र समोर आले आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जळगावचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांचेच दोन अत्यंत निकटवर्तीय आणि खंदे समर्थक या जागेसाठी थेट आमनेसामने ठाकले आहेत. यामुळे नाशिक भाजपमध्ये मोठी डोकेदुखी निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपचे नाशिक शहर उपाध्यक्ष निलेश बोरा आणि नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. निलेश बोरा आणि गणेश गीते या दोघांनीही विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. दोघेही मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक मानले जात असल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
कोणाचे पारडे जड?
निलेश बोरा यांनी नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आणि किंगमेकरची भूमिका बजावली होती. तर
गणेश गीते हे नाशिक महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राहिले असून, त्यांची स्थानिक पातळीवर आणि कार्यकर्त्यांवर मोठी पकड आहे.
आता मंत्री गिरीश महाजन यांचे दोन्ही निकटवर्तीय आमनेसामने आल्याने महाजन या अंतर्गत वादावर कसा तोडगा काढतात आणि कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंत गीतेंची एन्ट्री!
एकीकडे महायुती आणि भाजपमध्ये ही रस्सीखेच सुरू असतानाच, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही या निवडणुकीत शड्डू ठोकला आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते वसंत गीते यांनी देखील या जागेसाठी उमेदवारी अर्ज घेतल्याने नाशिकची ही निवडणूक त्रिकोणी आणि अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.















Discussion about this post