रावेर । दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून एकाने ग्राईंडर मशीनने वार करत २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना रावेर तालुक्यातील केर्हाळा येथे घडली आहे. भर दिवसाच्या खुनामुळे संपूर्ण रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

राजू रवींद्र कापडे (२५, रा. केर्हाळा, ता. रावेर) असे मृत तरुणाचे नाव असून, रामसिंग चिंधू भील (७२) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या हाणामारीत संशयित आरोपी देखील जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत.

नेमकी काय आहे घटना?
केर्हाळा गावातील इंदिरा नगर परिसरात ७२ वर्षीय रामसिंग भील हे मिस्तरी काम करून एकटेच वास्तव्यास आहेत. मृत तरुण राजू कापडे याची त्यांच्याशी ओळख होती. काही दिवसांपूर्वी राजू हा भील याच्यासाठी जेवणाचा डबा देखील पोहोच करत असे. मात्र, गेल्या काही दिवसांत त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरु होते.
मंगळवारी दुपारी दोघेही मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांच्यात पुन्हा वाद उफाळला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या रामसिंग भील याने लोखंडी आसारी कापण्याच्या ग्राईंडर मशीनने राजू कापडे याच्या मानेवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात राजू रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत संशयित रामसिंग भील याला एका घरात कोंडून ठेवले आणि रावेर पोलिसांना याची त्वरित माहिती दिली.
ग्रामस्थांनी कोंडून ठेवलेल्या संशयित रामसिंग भील याला ताब्यात घेऊन त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी राजू कापडे यांना मृत घोषित केले.
दरम्यान, संशयित रामसिंग भील याने मृत राजू कापडे याच्याशी वाद झाल्याची व हाणामारी केल्याची कबुली दिली आहे. मयत तरुणाच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रावेर पोलीस ठाण्यात सुरू होती. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.















Discussion about this post