जळगाव । मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला कडाडून विरोध केल्याचा राग मनात धरून, सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून देऊळवाडा (ता जळगाव) येथील एका २८ वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे.

आसोदा उड्डाणपुलाजवळील गवळी मुंजोबा मंदिरामागे शेताच्या बांधावर गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना मंगळवारी (६ ऑक्टोबर) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून, याप्रकरणी संशयित संदीप महाजन, त्याचा भाऊ विशाल महाजन आणि त्यांच्या आईवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रशांत सोनवणे याच्या मावस बहिणीचे संदीप महाजन याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधाला प्रशांतचा सक्त विरोध होता. हा विरोध संदीपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याने, संशयित संदीप महाजन, त्याचा भाऊ विशाल महाजन आणि त्यांच्या आईने प्रशांतचा पद्धतशीरपणे जाच सुरू केला. प्रशांतला वाटेत अडवून धमकावणे, त्याचा सर्वांसमोर अपमान करणे आणि सतत मानसिक छळ करणे असा बळकट त्रास या तिघांनी चालवला होता.
मानसिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल
या गुंड प्रवृत्तीच्या संशयितांच्या सततच्या त्रासामुळे प्रशांत प्रचंड मानसिक विवंचनेत वावरत होता. अखेर या सततच्या छळाला कंटाळून त्याने मंगळवारी सकाळी आसोदा उड्डाणपुलाजवळील शेताच्या बांधावर गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ऐन पंचविशीतील तरुण अशा प्रकारे मृत्युमुखी पडल्यामुळे देऊळवाडा परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पीडित कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.















Discussion about this post