जळगाव । फक्त ३५ टक्के रक्कम भरा आणि अवघ्या काही दिवसांत शिलाई मशिन मिळवा, असे मोठे आमिष दाखवून जळगाव तालुक्यातील तब्बल ९० महिलांना ३ लाख १० हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ‘बनवाबनवी’ करणाऱ्या सपना कोळी आणि संजय कोळी या दोघांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी सपना कोळी व संजय कोळी यांनी परिसरातील महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना कमी पैशात शिलाई मशिन मिळवून देण्याची योजना सांगितली. या योजनेला भुलून ९० महिलांनी विश्वासाने ३ लाख १० हजार रुपयांची रक्कम ३५ टक्के प्रमाणे गोळा करून दोघांच्या हातात टेकवली.
मशिनही नाही, पैसेही नाहीत!
पैसे देऊन बराच काळ लोटला तरी महिलांना मशिन मिळाली नाही. महिलांनी वारंवार विचारणा केली असता आरोपी टाळाटाळ करू लागले. अखेर आपले कष्टाचे पैसे बुडाल्याचे लक्षात आल्यावर महिलांची फसवणुकीची खात्री पटली.
फसवणूक झालेल्या महिलांनी एकत्र येत थेट नशिराबाद पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी सपना कोळी आणि संजय कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपींना लवकरात लवकर अटक करून आमची फसवलेली रक्कम परत मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी संतप्त महिलांकडून केली जात आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.















Discussion about this post