जळगाव । गणरायाच्या आगमनाला अवघा एक दिवस शिल्लक असताना राज्यभरात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. काल रात्रीपासून अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यासह जळगाव जिल्ह्याला आज देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर जाणवू लागला आहे. या हवामान प्रणालीला पूरक परिस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्यात आज जोरदार पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या जळगावकरांना पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात मंडप उभारणी, सजावट आणि गणेशमूर्तींच्या स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशा परिस्थितीत पावसाचा जोर वाढल्यास गणेश मंडळांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा अंदाज असून, या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटमाथ्यावरील काही भागांत कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.
याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांतही विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गणरायाच्या स्वागताला पावसाची सलामी
एकीकडे गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे पावसानेही जोर पकडल्याचे चित्र आहे. पावसासोबत काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post