जळगाव । गुजरातमधील अहमदाबाद येथून चोरीस गेलेली सुमारे ९ लाख रुपये किमतीची ‘किया कॅरेन्स’ कार जळगाव एमआयडीसी पोलिसांनी धाडसी कारवाई करत जप्त केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित वाहनाचा पाठलाग केला आणि चालकासह कार ताब्यात घेत गुजरात पोलिसांच्या स्वाधीन केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद ग्रामीण जिल्ह्यातील बोपल पोलीस ठाण्यात एमपी-०४-झेडएस-५१५५ क्रमांकाची किया कॅरेन्स कार चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, ही कार नशिराबाद टोलनाका पार करून जळगाव शहराच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संदीप सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल रमेश आहिरे आणि अफजल बागवान यांनी काशिनाथ चौक परिसरात नाकाबंदी केली. काही वेळात संशयित कार तेथे येताना दिसताच पोलिसांनी तिला थांबविण्याचा इशारा केला. मात्र चालकाने पोलिसांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने वाहन पळविण्याचा प्रयत्न केला.
यानंतर पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरू केला. काही अंतरावर अजिंठा चौफुली परिसरातील हिरो होंडा शोरूमसमोर कार अडवून चालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत संबंधित वाहन गुजरातमधून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.
घटनेची माहिती तत्काळ बोपल पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर गुजरात पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चोरीची कार तसेच चालक त्यांच्या ताब्यात देण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत थिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत पोलीस हवालदार संदीप सपकाळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल रमेश आहिरे आणि अफजल बागवान यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.














Discussion about this post