जळगाव/मुंबई । राज्यातील अनेक भागांत उन्हाचा तडाखा कायम असतानाच हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर आता राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांत उष्णता आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाड्यातील धाराशिव, बीड आणि लातूर, तसेच विदर्भातील नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय अहिल्यानगर, सोलापूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जळगावसह उत्तर महाराष्ट्रात उकाड्याचा तडाखा
राज्यात काही ठिकाणी पावसाचे संकेत मिळत असले, तरी उत्तर महाराष्ट्रातील उष्णतेचा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही. जळगावमध्ये कमाल तापमान ३६.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे दिवसा नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
राज्यातील यवतमाळ येथे सर्वाधिक ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला येथे ३६.८, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३६.५, तर जळगावमध्ये ३६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. धुळे, जेऊर, चंद्रपूर आणि वाशीम येथेही कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहिले.
राज्यात सध्या संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असताना इतर भागांत उष्णता आणि दमट हवामानामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो. पावसादरम्यान विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
पुढील काही दिवसांत तापमानात आणि पावसाच्या स्थितीत काय बदल होतात, याकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यांत पावसाची शक्यता निर्माण होते का, याबाबत उत्सुकता आहे.















Discussion about this post