जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहराजवळील गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पंकज चौधरी, हरीश चौधरी आणि रवींद्र चौधरी अशी मृत तरुणांची नावे असून, ते धरणगाव तालुक्यातील झुरखेडे गावचे रहिवासी होते. तिघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याने या घटनेने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळजवळील वनोली येथे सध्या देवीची यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी आलेल्या एका नातेवाईकाला सोडण्यासाठी पंकज चौधरी, हरीश चौधरी आणि रवींद्र चौधरी हे तिघे कारने गेले होते. नातेवाईकाला सोडल्यानंतर ते जळगावला आले आणि तेथून आपल्या झुरखेडे या गावी परतण्यासाठी निघाले होते.
गावी परतत असताना बांभोरी पुलावर त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या कंटेनरशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, कारमधील तिन्ही तरुणांना जीव गमवावा लागला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने झुरखेडे गावावर शोककळा पसरली आहे.
गावावर शोककळा; पोलिसांकडून तपास सुरू
या दुर्दैवी घटनेची माहिती समोर आल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हसत-खेळत घराबाहेर पडलेले तीन तरुण पुन्हा घरी परतलेच नाहीत, या विचाराने गावातील नागरिकही शोकाकुल झाले आहेत. दरम्यान, या अपघातप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.















Discussion about this post