नवी दिल्ली । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आपली भूमिका आक्रमकपणे मांडली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके तसेच प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आंदोलनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जामिनाच्या अटी-शर्तींच्या अधीन राहून बाहेर आलेल्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी दिल्लीतील पार्लमेंट पोलीस ठाण्यात जाऊन जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली. ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होईपर्यंत शांततेत आंदोलन सुरूच राहील,’ अशी घोषणा CJPकडून करण्यात आली आहे.

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सौरव दास आणि आशुतोष रांका हे आंदोलनाची अधिकृत परवानगी मिळवण्यासाठी पार्लमेंट पोलीस ठाण्यात पोहोचले होते. जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंतर-मंतरवर आंदोलनासाठी अचानक परवानगी मिळत नसून, त्यासाठी साधारणतः १० दिवस आधी अर्ज करावा लागतो.
यावर प्रतिक्रिया देताना सौरव दास यांनी पोलिस प्रशासनाला २४ तासांची मुदत दिल्याचे सांगितले. आंदोलनासाठी तारीख आणि वेळ पोलिसांनी निश्चित करावी; मात्र जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करण्याची परवानगी मिळाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.
‘आंदोलन करणे हा आमचा संवैधानिक अधिकार’
पोलिसांच्या कारवाईवर टीका करताना सौरव दास यांनी नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला. दिल्ली पोलीस क्रूरपणे वागत असून, त्यांना बेकायदेशीर आदेश दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला. स्वतंत्र पत्रकार आणि वकिलांशीही गैरवर्तन होत असल्याचा आरोप करत पोलिस प्रशासनाने याची दखल घ्यावी, असे ते म्हणाले.
‘आंदोलन करणे हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. आम्ही जंतर-मंतरवर आंदोलनासाठी परवानगी मागत आहोत,’ अशी भूमिका सौरव दास यांनी मांडली. दरम्यान, या आरोपांवर दिल्ली पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आल्यास त्यातून या प्रकरणातील दुसरी बाजूही स्पष्ट होऊ शकते.















Discussion about this post