जळगाव । उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे सेवेत एक नवा अध्याय जोडला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २८ एप्रिल रोजी दोन नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. अयोध्या कॅन्ट -लोकमान्य टिळक टर्मिनस(मुंबई) आणि वाराणसी ते हडपसर(पुणे) या दोन गाड्यांचे २९ एप्रिल रोजी जळगाव आणि भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन होणार असून, यानिमित्ताने विशेष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्या धाम – मुंबई (LTT) अमृत भारत एक्सप्रेस (ट्रेन क्र. ०२२१२):
ही एक्सप्रेस (२२२११/१२) सायंकाळी ४:४५ वाजता अयोध्या कॅन्ट येथून सुटेल आणि अंदाजे २६ तासांत मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही ट्रेन सुलतानपूर जंक्शन, प्रतापगड, प्रयागराज जंक्शन, माणिकपूर, सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे या एकूण १२ स्थानकांमधून जाईल. याचा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील हजारो प्रवाशांना थेट फायदा होईल.
बनारस – हडपसर (पुणे) अमृत भारत एक्सप्रेस (ट्रेन क्र. ०२५३१):
बनारस-पुणे अमृत भारत एक्सप्रेस दररोज धावणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी, २८ एप्रिल रोजी, गाडी क्रमांक ०२५३१ बनारस-हडपसर (पुणे) अमृत भारत दुपारी ४:४५ वाजता बनारस स्थानकावरून सुटेल. ती तिसऱ्या दिवशी रात्री १२:५५ वाजता हडपसर (पुणे) येथे पोहोचेल. ही ट्रेन ज्ञानपूर रोड, प्रयागराज, फतेहपूर, गोविंदपुरी, ओराई, वीरंगना लक्ष्मीबाई झाशी, बिना, राणी कमलापती (भोपाळ), नर्मदापुरम, इटारसी, हरदा, खांडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव (शिर्डीसाठी), अहिल्यानगर आणि दौंड मार्गे हडपसर (पुणे) येथे पोहोचेल. हा प्रवास अंदाजे ३० तासांत पूर्ण होईल. विशेष म्हणजे, साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना ही ट्रेन थेट मार्ग उपलब्ध करून देईल.















Discussion about this post