जळगाव । पावसाळा संपत असतानाच राज्यातील नागरिकांसमोर आता उष्णतेचे नवे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनवर परिणाम झाल्यानंतर राज्यातील अनेक भागांत पावसाची कमतरता जाणवली असून, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा वाढू लागल्याने ‘ऑक्टोबर हिट’ची चाहूल लागली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. अमरावतीमध्ये सप्टेंबर महिन्यात तापमानाने तब्बल १८ वर्षांतील उच्चांक गाठल्याची माहिती हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली आहे. शहरातील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. साधारणपणे सप्टेंबरमध्ये ३२ ते ३४ अंशांच्या आसपास राहणारे तापमान यंदा ३६ अंशांवर पोहोचल्याने उष्णतेची तीव्रता जाणवत आहे.

नंदुरबारमध्येही उन्हाचा तडाखा
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी नंदुरबार जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. पावसाची कमतरता आणि वातावरणातील बदलामुळे उष्णतेची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे. ऑक्टोबरमध्ये थंडीची चाहूल लागण्याऐवजी नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम खरीप पिकांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संभाजीनगरमध्ये ३९ वर्षांतील उच्चांकी तापमान
छत्रपती संभाजीनगरमध्येही सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस ३६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सप्टेंबरमधील हे तापमान तब्बल ३९ वर्षांतील उच्चांकी नोंदींपैकी एक ठरले आहे. यापूर्वी २६ सप्टेंबर १९८७ रोजी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
जळगावमध्येही उन्हाचे चटके
दरम्यान, जळगावमध्येही ऑक्टोबरच्या सुरुवातीला तापमानाचा पारा वाढला आहे. सप्टेंबरच्या अखेरीस जळगावमध्ये कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवत आहे. सकाळपासूनच ऊन वाढत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
जळगावसारख्या उष्ण आणि कोरड्या हवामानाच्या जिल्ह्यात पावसाची उघडीप, कमी आर्द्रता आणि स्वच्छ आकाश यामुळे दिवसाचे तापमान वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच जळगावकरांना उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. विशेष म्हणजे, यंदा पावसातील खंड आणि त्यानंतर वाढलेले तापमान यामुळे शेतकऱ्यांसमोरही नवी चिंता निर्माण झाली आहे. खरीप पिकांच्या अंतिम टप्प्यावर तापमान वाढल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठ्या प्रमाणावर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना विविध सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता दुष्काळानंतर वाढत्या उष्णतेचे संकट किती तीव्र होते, याकडे जळगावसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post