नागपूर । महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहन चालकांसाठी दिलासादायक अन् आनंदाची बातमी आहे. राज्यातील ई-वाहन (ईव्ही) वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिले. तसेच या निर्णयाच्या अंमलबजावणी पासून आज पर्यंतच्या काळात टोल घेतला गेला असल्यास पुरावा सादर केल्यावर नागरिकांना टोल परतावा द्यावा, असे आदेशही त्यांनी दिले.
राज्यातील तीन महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने घेतला होता. मात्र असे असून देखील या महामार्गांवर अशा वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात आला. यासंदर्भात आज विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. हा टोल परत केला जाणार का? आणि टोल वसूली करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार काय? असा प्रश्न काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सभागृहात विचारला. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी सरकारचे धोरणाविषयी माहिती दिली. दरम्यान यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील सरकारला पुढील आठ दिवसांत इलेक्ट्रिक वाहन चालकांकडून होणारी ही बेकायदेशीर टोल वसूल बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी राज्यातील अपुऱ्या चार्जिंग स्टेशन्सचा मुद्दाही उपस्थित करत, ई-वाहनांसाठी किमान 120 के.डब्लू. (kw) क्षमतेची फास्ट चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. सध्या उपलब्ध चार्जिंग स्टेशन्सवर वाहन चार्जिंगसाठी आठ तास लागत असल्याने ही व्यवस्था तातडीने सुधारावी, असेही त्यांनी म्हटले.
प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत समृद्धी महामार्ग, मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग आणि शिवडी–न्हावाशेवा अटल सेतू या मार्गांवर ई-वाहनांना टोलमाफीचे धोरण 23 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आले असून 22 ऑगस्ट 2025 पासून अंमलबजावणी सुरू आहे. ईव्ही फास्टटॅग रजिस्ट्रेशन, एनआयसी डेटाबेसमधील नोंदणी आणि बँक इंटिग्रेशनची प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.















Discussion about this post