जळगाव | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या प्रक्रियेत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुमारे १० कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सहकार विभागाने सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
माहिती अधिकार कार्यकर्ते बाबी उर्फ अधिकारी यांनी यासंदर्भात सहकार विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान बँकेने काही शेतकऱ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने व्याजाची वसुली केली. शासनाच्या सहकार विभागाने स्पष्ट निर्देश दिले होते की, योजनेचा लाभ देताना शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची अतिरिक्त व्याज वसुली करण्यात येऊ नये. मात्र, बँकेने या शासकीय निर्देशांना केराची टोपली दाखवत शेतकऱ्यांची आर्थिक लूट केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या १० कोटींच्या कथित घोटाळ्याची गंभीर दखल घेत सहकार व पणन विभागाने थेट सहनिबंधकांना पत्र पाठवून चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता जळगाव जिल्हा उपनिबंधकांमार्फत (DDR) या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे
दरम्यान, या प्रकरणात आधी ‘कॅग’ (महालेखापरीक्षक) स्तरावर चौकशी झाल्याचा दावा केला जात होता. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान अशी कोणतीही चौकशी झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले असून संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष या चौकशीकडे लागले आहे.
नियमबाह्य व्याज वसुलीच्या या आरोपामुळे जिल्हा बँकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता जिल्हा उपनिबंधकांच्या चौकशी अहवालात काय निष्पन्न होते, दोषी अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई होणार का, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशातून गेलेली हक्काची रक्कम त्यांना परत मिळणार का? याकडे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post