जळगाव । जळगावच्या रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या १० दिवसांच्या एका नवजात चिमुकल्या बालिकेला मृत जनावरे टाकण्याच्या अत्यंत दुर्गंधीयुक्त आणि अस्वच्छ निर्जन स्थळी उघड्यावर फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. अंगावर मुंग्या फिरत असताना आणि प्रचंड यानेत असताना एका सतर्क तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या निष्पाप बालिकेचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.
नेमकी काय होती घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास गिरणागाव – पिंप्राळा रेल्वे पुलालगत, आझादनगरकडून पिंप्राळाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याशेजारी एक निर्जन परिसर आहे. या भागात मृत जनावरे टाकली जात असल्याने तिथे प्रचंड दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य असते. अशा अत्यंत अस्वच्छ ठिकाणी अज्ञात पालकांनी आपल्या १० दिवसांच्या तान्हुल्या मुलीला बेवारस सोडून पळ काढला होता.
या चिमुकलीच्या अंगावर मुंग्या चढल्या होत्या आणि ती वेदनेने विव्हळत होती. योगायोगाने, हरि विठ्ठल नगर येथे राहणारे आणि पेशाने पेंटर असलेले शिवाजी मधुकर गायकवाड (वय ३५) हे त्या बाजूने जात असताना त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता क्षणाचा विलंब न लावता त्या बालिकेला तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवले आणि तात्काळ पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली. त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे चिमुकलीचा जीव वाचला.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून पाहणी; तरुणाचा गौरव
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळी व संबंधित रुग्णालयाला भेट देऊन त्या लहान चिमुकलीची विचारपूस केली. तसेच तिची प्रकृती व पुढील देखभालीबाबत वैद्यकीय अधिकारी व बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
याप्रसंगी, ऐनवेळी प्रसंगावधान दाखवून चिमुकलीचे प्राण वाचवणारे आणि पोलिसांना तत्परतेने सहकार्य करणारे पेंटर शिवाजी मधुकर गायकवाड यांच्या समयसूचकतेचे व धाडसाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले.
अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा क्र. ३११/२०२६ नोंदवण्यात आला असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ९३ तसेच अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ चे कलम ७५ व इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या निष्पाप बालिकेला अशा पद्धतीने बेवारस सोडणाऱ्या निर्दयी आई-वडिलांचा किंवा पालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.















Discussion about this post