जळगाव । मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे यांचे नाव पुढे करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा, तसेच शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कथित ऑडिओ क्लिपमधील उल्लेखावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील यांनी राजकीय षड्यंत्राची शक्यता व्यक्त केली. खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव या प्रकरणात आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या वादात ओढण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. आपल्या नेत्याची प्रतिमा मलिन करून त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणामुळे महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. या प्रकरणातील सत्य जनतेसमोर येणे आवश्यक असून, केवळ आरोप-प्रत्यारोपांवरून निष्कर्ष काढण्याऐवजी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मनोज जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये दिल्याच्या आरोपावरही गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५०० कोटी रुपये दिलेले नाहीत आणि मनोज जरांगे पाटील यांनीही अशी रक्कम घेतलेली नाही, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तपासातून जे काही निष्पन्न होईल, ते जनतेसमोर आले पाहिजे. मात्र, आपल्या नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यामागील सत्यही उघड झाले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, गुलाबराव पाटील यांच्या आरोपांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीतून नेमके काय समोर येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post