अमळनेर । तालुक्यातील टाकरखेडा येथे कौटुंबिक वादातून पती-पत्नीने आपल्या दोन लहान मुलांसह धावत्या रेल्वेखाली झोकून देत जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने टाकरखेडा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल आणि त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल हे आपल्या दोन मुलांसह पहाटे सुमारे चार वाजता घराबाहेर पडले. त्यांच्यासोबत दुसरी इयत्तेत शिकणारा सनी आणि अंगणवाडीत जाणारा राज हे दोन चिमुकले होते.
घरातून बाहेर पडल्यानंतर चौघांनी रेल्वेखाली झोकून दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत सुनील भिल, पार्वती भिल आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे सुमारे ४.४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, या कुटुंबाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादाची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे.
एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह चौघांचा दुर्दैवी अंत झाल्याने टाकरखेडा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.














Discussion about this post