महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. महायुती सरकारने या हप्त्याच्या वितरणासाठी मोठा निर्णय घेत सामाजिक न्याय विभागाकडून तब्बल ३४४.७४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवला असून, यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे.
पुढील २४ ते ४८ तासांत पैसे खात्यात जमा होणार
प्रशासकीय स्तरावर निधी हस्तांतरणाचा शासन निर्णय निघाल्यामुळे बँक व्यवहारांची प्रक्रिया आता युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. निधी वर्ग झाल्यामुळे येत्या २४ ते ४८ तासांत, म्हणजेच कोणत्याही क्षणी पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात (DBT द्वारे) पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत राज्यातील महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून लाभार्थी महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
तांत्रिक अडचणी दूर, निधी वितरणाला वेग
सामाजिक न्याय विभागाची तरतूद महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केल्यामुळे सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर झाल्या आहेत. सोमवारी निधी हस्तांतरित झाल्याने आता पुढील दोन दिवसांत थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
१ कोटी ६५ लाख महिलांना लाभ, तर ९० लाख महिलांचे अर्ज अपात्र
राज्यभरातील सुमारे १ कोटी ६५ लाख पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हा जुलै महिन्याचा हप्ता खात्रीशीरपणे जमा होणार आहे. मात्र, दुसरीकडे कागदपत्रांची अपूर्तता किंवा योजनेच्या निकषांत न बसल्यामुळे जवळपास ९० लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.














Discussion about this post