नंदुरबार : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नंदुरबार जिल्ह्यापर्यंत पोहोचले असून, कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील, ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांच्यासह आतापर्यंत सहा जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या नंदुरबारमधील शिक्षक मयूर आबाजी ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणात ऋतुजा पाटील आणि तिचा प्रियकर गौरव पाटील हे सुरुवातीला फरार होते. त्यानंतर पोलिसांनी गौरव पाटील याला अटक केली. अमृत पाटील आणि गौरव पाटील यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नंदुरबारमधील शिक्षकाची मध्यस्थी?
या प्रकरणात आता मयूर आबाजी ठाकरे हे नवे नाव समोर आले आहे. ठाकरे हे नंदुरबारमधील एका नामांकित शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या तपासानुसार, प्रवीण पाटील आणि अमृत पाटील यांच्यात पेपरफुटीच्या संदर्भात भेट घडवून आणण्यात मयूर ठाकरे यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील महत्त्वाचे दुवे जोडण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, मध्यस्थी करणाऱ्या शिक्षकाची भूमिका नेमकी काय होती, याचाही तपास केला जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मयूर ठाकरे यांचा शोध घेण्यात येत आहे.
आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित दाम्पत्य
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी अमृत पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धा जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी उज्ज्वला पाटील याही याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. पाटील दाम्पत्याला राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला असल्याची माहिती समोर आली आहे.
अमृत पाटील यांच्या अटकेनंतर शाळेतील त्यांच्या सहकारी शिक्षकांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सहकाऱ्यांनी त्यांच्या स्वभावाबाबत माहिती देताना या घटनेमुळे धक्का बसल्याचे सांगितले.
MPSC औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात नंदुरबार कनेक्शन समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पेपरफुटीचे जाळे नेमके किती दूरपर्यंत पसरले आहे आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे.














Discussion about this post