धुळे । धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील म्हसदी गावाजवळ एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळे ते म्हसदी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला ट्रकने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने घडलेल्या या अपघातात शाळा-कॉलेजच्या ४० ते ४५ विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी ५ ते ६ विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी एसटी बसमध्ये शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. म्हसदी गावाजवळ येताच भरधाव ट्रकने बसला जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसचे प्रचंड नुकसान झाले. अपघातानंतर बसमध्ये एकच आक्रोश पसरला. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बसमध्ये अडकलेल्या जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढत बचावकार्य सुरू केले.
पालकांची रुग्णालयात धाव, परिसरात चिंतेचे वातावरण
घटनेची माहिती मिळताच साक्री व धुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या विद्यार्थ्यांवर डॉक्टरांचे पथक तातडीने उपचार करत आहे. अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच चिंताग्रस्त पालकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे परिसरात प्रचंड भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
वाहतूक सुरळीत; पोलिसांत गुन्हा दाखल
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्तनावरील वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघात नेमका कसा घडला, याचा पुढील तपास धुळे पोलीस करत आहेत.















Discussion about this post