जळगाव । जळगाव जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी पशुधन, चारा लागवडीसाठी जमीन आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या इच्छुक पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुक पशुपालकांनी [या ऑनलाइन अर्ज लिंकवर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSet3dW9y-uiGL9PuNVTPCL0uOmPvJqY3VuTEKf7s9ZwHtQRgw/viewform?usp=publish-editor क्लिक करून अर्ज भरावा. या उपक्रमाची माहिती जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी, संस्थाप्रमुख तसेच क्षेत्रीय पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन अर्जाची लिंक पशुपालक, शेतकरी, ग्रामपंचायती, पशुपालकांचे व्हॉट्सॲप गट आणि शेतकरी गटांमध्ये व्यापक प्रमाणात प्रसारित करावी. तसेच सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या पशुपालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना अर्ज भरण्यास प्रोत्साहित करावे. आवश्यकतेनुसार अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
एकही पात्र व इच्छुक पशुपालक माहितीअभावी अर्ज करण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रब्बी हंगामात हिरव्या चाऱ्याचे जास्तीत जास्त उत्पादन घेऊन जळगाव जिल्ह्यातील पशुधनासाठी चारा सुरक्षा निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे















Discussion about this post