नागपूर । नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत मतदानाच्या काही तास आधी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाकडून यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून नितेश कराळे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांच्या विरोधात निवडणूक लढवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण केल्याचा ठपका कराळे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पक्षाच्या अधिकृत पत्रानुसार, कराळे यांनी पक्षाच्या धोरणांविरोधात जाऊन अपक्ष उमेदवारी दाखल केली. तसेच शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचा दावा केल्याबाबत पक्षाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ही कृती पक्षशिस्त, पक्षाची धोरणे आणि महाविकास आघाडीच्या निर्णयांचे उल्लंघन करणारी असल्याचे पक्षाने म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशानुसार नितेश कराळे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अभिजित गोविंदराव वंजारी अधिकृत उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्रातून स्पष्ट केले आहे.मतदानाच्या काही तास आधी झालेल्या या निर्णयामुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे लक्ष लागले आहे.
भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढत
नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी झाले होते. यंदा त्यांना पुन्हा विजय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचार केला आहे. तर भाजपनेही मतदार नोंदणी, बैठका आणि विविध संघटनांचा पाठिंबा मिळवण्यावर भर दिला आहे.
भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आशिष शेलार आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांसारख्या नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला. दुसरीकडे, काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांच्यासाठी विजय वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर, नाना पटोले, सुनील केदार आणि नितीन राऊत यांनी प्रचार केला.
निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
या निवडणुकीत भाजपची संघटनात्मक ताकद आणि नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचवेळी अभिजित वंजारी यांची मागील सहा वर्षांतील कामगिरी आणि काँग्रेसची रणनीतीही निर्णायक ठरू शकते. निवडणुकीतील मतमोजणी आणि पसंतीक्रमाच्या मतांचे गणित यामुळे निकालाचे चित्र कसे स्पष्ट होते, याबाबत उत्सुकता आहे.दरम्यान, मतदानाच्या काही तास आधी नितेश कराळे यांच्यावर झालेल्या कारवाईचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कितपत फायदा होतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post