जळगाव । महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत पावसाची दमदार हजेरी लागली आहे. अनेक ठिकाणी नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, पुढील चार दिवस जळगाव जिल्ह्यातही हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ४ ते ७ जुलैदरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून, यामुळे रखडलेल्या शेतीकामांना वेग मिळण्याची अपेक्षा आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हा पाऊस जिल्हाभर एकसारखा पडणार नाही. स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार काही भागांत मुसळधार तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ४ ते ७ जुलै या कालावधीत पावसाचा मुख्य जोर राहणार असून, ८ जुलैपासून पावसाचा जोर कमी होऊन तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात दिवसाचे कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस, तर रात्रीचे किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, भडगाव, बोदवड, जामनेर, एरंडोल आणि भुसावळ या तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाची मोठी कमतरता आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या आशा आगामी चार दिवसांच्या पावसावर टिकून आहेत. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी व इतर शेतीकामांचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ३ जुलैपर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ७१ टक्के इतकाच झाला आहे. म्हणजेच अद्याप २९ टक्के पावसाची तूट कायम आहे. मात्र, पुढील चार दिवस अपेक्षित पाऊस झाल्यास ही तूट मोठ्या प्रमाणात भरून निघेल आणि खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.















Discussion about this post