मुंबई । महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मध्यरात्री ‘वर्षा’ निवासस्थानी भेट झाल्याचा दावा ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया हाऊसने केला आहे. या कथित भेटीच्या वृत्तामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार का? अशी चर्चा रंगली आहे.
या कथित गुप्त भेटीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत सावध पण स्पष्ट भूमिका मांडली आहे. “ही केवळ एक अफवा असू शकते. जोपर्यंत या भेटीची अधिकृत शहानिशा होत नाही, तोपर्यंत त्यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही,” असे सपकाळ यांनी म्हटले आहे. मात्र, या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात संशयाचे धुके गडद झाले आहे.
दुसरीकडे, आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ प्रकरणी व्यक्त केलेल्या दिलगिरीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी सडकून टीका केली. “गायकवाड यांनी माफी मागितलेली नाही. त्यांनी ज्या अश्लील भाषेत शिव्या दिल्या, ब्राह्मण समाजावर जातीय टिपणी केली आणि वारकरी संप्रदायातील संतांविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधाने केली, ती अक्षम्य आहेत. अशा व्यक्तीवर केवळ दिलगिरीने भागणार नाही, तर कठोर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे,” असा आक्रमक पवित्रा सपकाळ यांनी घेतला आहे.














Discussion about this post