जळगाव । मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरत असलेल्या सोने-चांदीच्या दरांना अखेर ब्रेक लागला आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात मंगळवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली. तीन ते चार दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या दरात तब्बल ३ हजार रुपयांची वाढ झाली, तर सोन्याच्या दरातही प्रति तोळा १ हजार रुपयांची तेजी आली आहे.
सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा विनाजीएसटी प्रति तोळा दर १ लाख ५१ हजार ५०० रुपये होता. त्यात आज १ हजार रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचा दर १ लाख ५२ हजार ५०० रुपये प्रति तोळा झाला आहे. त्यामुळे सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आज अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
चांदीच्या दरातही आज मोठी उसळी पाहायला मिळाली. मागील तीन ते चार दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या दरात मंगळवारी थेट ३ हजार रुपयांची वाढ झाली. परिणामी, एक किलो चांदीचा विनाजीएसटी दर २ लाख ३६ हजार रुपयांवरून २ लाख ३९ हजार रुपये इतका झाला आहे.
आठवडाभराच्या घसरणीनंतर बाजाराची दिशा बदलली
मागील आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत होती. त्यामुळे दर आणखी कमी होतील, या अपेक्षेने काही ग्राहक खरेदीसाठी प्रतीक्षा करत होते. मात्र, आज अचानक दोन्ही धातूंच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत सराफ बाजारावर होत असतो. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आता घसरणीनंतर पुन्हा दरवाढ झाल्याने बाजाराची पुढील दिशा काय असेल, याकडे सराफ व्यावसायिकांसह ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
दरवाढीमुळे आज सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये नाराजी दिसून आली. विशेषतः लग्नसराई, सणासुदी किंवा गुंतवणुकीसाठी खरेदीचा विचार करणाऱ्यांना वाढलेल्या दराचा फटका बसण्याची शक्यता आहे.















Discussion about this post