जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सोन्या-चांदीच्या दरघसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. सलग तीन दिवस भाव कमी झाल्यानंतर गुरुवारी जळगावच्या सुवर्णनगरीतील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली. बाजार उघडताच सोन्याच्या दरात ₹1,700, तर चांदीच्या दरात ₹3,000 प्रति किलो वाढ नोंदवण्यात आली.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर होत आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या भावात घसरणीचे सत्र सुरू होते. या आठवड्यातही सुरुवातीचे तीन दिवस दर कमी झाले. बुधवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर सायंकाळच्या सत्रात चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली. त्यानंतर गुरुवारी सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांनी उसळी घेतली.
24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1.53 लाखांवर
बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा 1 तोळ्याचा विना GST भाव ₹1 लाख 51 हजार 800 इतका होता. गुरुवारी त्यात ₹1,700 ची वाढ झाली असून, भाव आता ₹1 लाख 53 हजार 500 प्रति तोळा इतका झाला आहे.
चांदीही महागली
चांदीच्या दरातही गुरुवारी मोठी वाढ झाली. बुधवारी चांदीचा विना GST भाव ₹2 लाख 35 हजार प्रति किलो होता. गुरुवारी त्यात ₹3,000 ची वाढ झाली असून, चांदीचा भाव आता ₹2 लाख 38 हजार प्रति किलो झाला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, मागणी-पुरवठा आणि अन्य आर्थिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात पुढील काळातही चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांसह गुंतवणूकदारांचे सराफा बाजारातील पुढील दरांकडे लक्ष लागले आहे.














Discussion about this post