मुंबई : गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पुढील वर्षी याच ठिकाणी भाषणासाठी येईन, तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. शिवसेनेच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकांना जोडण्याचे काम होत असल्याचे सांगितले. ‘एकनाथ शिंदे साहेबांना जो आडवा येईल, त्याचा सत्यानाश होवो,’ असे वक्तव्यही त्यांनी केले.
गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची तुलना रामसेतूच्या निर्मितीशी केली. ज्याप्रमाणे रामसेतू तयार झाला, त्याप्रमाणे आमच्या नेत्याने लोकांना जोडण्याचे काम केले, असे म्हणत त्यांनी शिंदे यांचे कौतुक केले. तसेच, ‘भगवा आमच्या खांद्यावर आणि शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर’ हे वाक्य आपल्याला विशेष आवडत असल्याचे त्यांनी सांगितले.शिवसैनिकांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन काम केले पाहिजे, अशी भूमिकाही या भाषणातून अधोरेखित झाली.
भाषणादरम्यान गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवरही टीका केली. बांगलादेशी नागरिकांची बाजू घेत असल्याचे तसेच ५०० कोटी रुपये घेतल्याचे आरोप खोटे असल्याचे त्यांनी म्हटले. पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर निशाणा साधताना, ‘आमचे शिंदे साहेब हे देणारे आहेत, घेणारे नाहीत,’ असे विधान त्यांनी केले.
राजकीय मुद्द्यांसोबतच गुलाबराव पाटील यांनी जलसंधारणाच्या कामांवरही भर दिला. पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांनी जलसंधारणासाठी उपलब्ध निधीपैकी ५० टक्के रक्कम खर्च केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, आपल्या मतदारसंघात नाले खोल करण्याचे काम हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना पुढील दसरा मेळाव्यापर्यंत ते मुख्यमंत्री होतील, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल्याने त्यांच्या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.















Discussion about this post